
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोरगाव येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत ऋतुजा दिपक तावरे (वय १९) हिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीवरील रुपाली अरुण कौले व अंकीता विष्णु तावरे या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. या तिघीही सुपे येथील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात शिकत होत्या.
याबाबत माहिती अशी की, विद्या प्रतीष्ठानच्या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्गात शिकणाऱ्या ऋतुजा दीपक तावरे, अंकीता विष्णू तावरे व रुपाली अरुण कौले या तिघी आज सुट्टीनंतर आपल्या दुचाकीवरुन सुप्यावरुन मोरगावला येत होत्या. सुपा-मोरगाव या रस्त्यावरील राजबाग पाटीनजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये ऋतूजा दिपक तावरे (रा. शेराचीवस्ती, मोरगाव) या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात अंकीता तावरे आणि रुपाली कौले या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना मोरगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.