मुंबई : प्रतिनिधी
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयावर याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले आहे. तसेच काळजी करण्याचे कोणतेही कारण नसून संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, मी आणि सदानंद दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आलो आहोत. दोघांचीही प्रकृती व्यवस्थित असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र आमच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःचे कोरोना टेस्ट करून घ्यावी, ही नम्र विनंती आहे. सर्वांनी काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. मंगळवारी संपलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी व इतर अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येने अचानक उसळी घेतली आहे. काल राज्यात २ हजार १७२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये एकूण रुग्ण संख्येच्या निम्मी रुग्णसंख्या ही मुंबई शहरातून आहे.