नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात ओमीक्रॉन आणि कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आतापासूनच काही निर्बंध आणणे आवश्यक आहे. याबाबत ढिसाळपणा झाल्यास जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता येवू शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. दरम्यान, दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इतर राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दिल्लीमध्ये मागील चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोना आणि ओमीक्रॉनने डोके वर काढले आहे. मागील २४ तासात दिल्लीत २४९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. जून महिन्यानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधित रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
सध्याची स्थिती पाहता जानेवारी महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ञांकडून व्यक्त होत आहे. दिल्लीमध्ये ओमीक्रॉनचा समूहसंसर्ग वाढत असल्याचे निरीक्षणही काही तज्ञांनी नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून तिसरी लाट आल्यास भयंकर स्थिती निर्माण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातही प्रशासन ‘अलर्टवर’
महाराष्ट्रातही कमी अधिक प्रमाणात कोरोना आणि ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासन अलर्टवर आहे. दिल्लीतील स्थिती पाहता महाराष्ट्रासाठीही चिंताजनक बाब असल्यामुळे प्रशासनाने सतर्क होत काही निर्बंधही लागू केले आहेत.