लोकप्रतिनिधी व अधिकारी लोकांच्या कामांसाठी कटीबद्ध राहिल्यास ‘क्वालिटी वर्क’ होते : धनंजय मुंडे
अंबाजोगाई पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण
अंबाजोगाई : प्रतिनिधी
पंचायत समिती असेल किंवा लोकशाहीतील कोणतीही संस्था असेल तिथे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी मिळून आपल्या पदाचा वापर लोकांच्या कामांसाठी कटिबद्ध राहून केला तर ती संस्था आदर्श बनते व तिथे ‘क्वालिटी वर्क’ केले जाते, असे मत सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.
अंबाजोगाई पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण ना. मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले, यावेळी बीड जिल्हा परिषद, माजलगाव पंचायत समितीची इमारत अशा काही महत्वाच्या प्रशासकीय इमारतीचे काम मागील सरकारच्या काळात अर्धवट निधी दिल्याने अपूर्ण राहिले होते. त्या इमारतींचा पाया ज्यांनी भरला त्यांचे योगदानही आम्ही मान्य करू तसेच या इमारतींना पूर्ण करण्यासाठी लागणारा उर्वरित खर्च आमच्या सरकारने उपलब्ध करून दिला असल्याने या कामांच्या पूर्णत्वाचा कळस आमच्या हस्ते चढतो आहे, याचे समाधान असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
बीड जिल्हा हा मागासलेला म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन एकत्रित विकास साधने गरजेचे आहे. असेही ना. मुंडे म्हणाले. परळी मतदारसंघास आणखी 2.83 टीएमसी पाणी उपलब्ध झाले असून अंबाजोगाई तालुक्यात तीन नव्या साठवण तलावांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याचेही ते पुढे बोलताना म्हणाले.
पांदण रस्ते, गायगोठे यांसारखे कामे दर्जेदार व्हावेत यासाठी हवा तितका निधी उपलब्ध करून देऊ, ही झालेली कामे पाहायला बाहेरून लोकांनी यावे, चौकश्या करणाऱ्याकरिता नाही, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावताचा चांगलाच हशा पिकला होता.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, आमदार संजय दौंड, पृथ्वीराज साठे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, बन्सी सिरसाट, राजेश्वर चव्हाण, विलास सोनवणे, गोविंदराव देशमुख, दत्ता पाटील, बबन लोमटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, शंकर उबाळे, बालासाहेब शेप, पिंटू मुंडे, बाळासाहेब मस्के, शिवसेना तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, सुधाकर माले, बालासाहेब गंगणे, ताराचंद शिंदे, गजानन मुडेगावकर यांसह अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती विजयमाला जगताप, उपसभापती श्रीमती अलिशान पटेल, सदस्य मीनाताई भताने, तानाजी देशमुख, कडाबाई चामनर, रखमाजी सावंत, मच्छिंद्र वालेकर, अनिता भिसे, विठ्ठल ढगे, गटविकास अधिकारी संदिप घोणसिकर आदी पदाधिकारी, कर्मचारी व स्थानिक उपस्थित होते.
यावेळी पंचायत समितीच्या इमारत बांधकामाचे स्वरूप, त्यासाठी लागलेला खर्च, पुढे फर्निचर व अन्य कामांसाठी लागणारा निधी व सुरू असलेल्या कामाची माहिती प्रास्ताविकात दिली. जि. प. अध्यक्षा सौ. शिवकन्या ताई सिरसाट, आ. संजय दौंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गोविंद महाराज केंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमा दरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील 131 महिला बचत गटांना उमेद अभियान अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अडीच कोटी रुपयांच्या धनादेशांचे वितरण ना. मुंडे व मान्यवरांच्या वतीने करण्यात आले.
स्व. अटल बिहारींची ‘ती’ कविता…
बीड जिल्ह्यात विकासकामे करताना मन मोठे करणे गरजेचे आहे, असे सांगतानाच धनंजय मुंडे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या “टूटे मन से कोई खडा नहीं होता, और छोटे मन से कोई बडा नहीं होता” या कवितेच्या दोन ओळी म्हणत व्यापक विकासाचे आपले उद्दिष्ट व्यक्त केले.
दरम्यान यापुढे सातत्याने महिन्यातून किमान दोन वेळा अंबाजोगाई येथील जनतेसाठी उपलब्ध राहणार असल्याचा शब्द ना. मुंडेंनी दिला. तसेच पंचायत समिती इमारतीतील फर्निचर साठी लागणारा निधी लवकरच उपलब्ध करून देऊ असा विश्वासही व्यक्त केला.