मुंबई : प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आरोग्य विभागातील भरतीमधील पेपरफुटीबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची निवृत्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच पुन्हा होणाऱ्या परीक्षेची विद्यार्थ्यांकडून फी घेतली जाणार नसल्याचेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रवीण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत आरोग्य विभागाच्या भरतीबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागातील पेपरफुटीसंदर्भात निवृत्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करणार आहे. विद्यार्थ्यांकडून पुन्हा होणाऱ्या गट ‘क’ आणि ‘ड’ पदांच्या परीक्षेची फी आकारली जाणार नाही. तसेच या पुढील होणाऱ्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा विचार आहे. ऑनलाईनपद्धतीने पेपर घेतल्यास पेपर लीक होणार नाहीत. त्यामुळे या परीक्षेमध्ये धोरणात्मक बदल करण्याचा विचार केला जात असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
जनतेच्या हितासाठी जागा भरण्याचा हेतू आहे. परंतु यापुढे कोणत्याही मुलांवर अन्याय होऊ नये यासाठी कुंपणच शेत खात असलेली पद्धत बदलण्याची गरज आहे. जे या प्रकरणी दोषी आहेत, त्यांच्यावर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांना पाठीशी न घालण्याचे आदेश दिले असल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.