बारामती : प्रतिनिधी
बारामतीतील साहित्य रसिकांनी एकत्र येत सुरू केलेला ‘बारामतीचा साहित्यकट्टा’ हा उपक्रम साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे. आज शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नामवंत कवयित्री सुनीता रामचंद्र, स्वाती शुक्ल, ज्योती भारती आणि प्रतिभा साबळे यांचा सहभाग असलेली कविता आणि गझलची मैफल रंगणार आहे.
बारामतीत मागील काही वर्षांपासून ‘बारामतीचा साहित्यकट्टा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात नवोदित तसेच नामवंत लेखकांनी सहभागी होत बारामतीतील साहित्य प्रेमींशी संवाद साधला आहे. प्रत्येक महिन्यातील एका शनिवारी हा उपक्रम आयोजित केला जातो. यामध्ये बारामतीकरांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे.
नावाजलेल्या आणि शून्यातून विश्व निर्माण केलेल्या साहित्य क्षेत्रातील मान्यवरांशी भेटण्याची संधी या साहित्य कट्ट्याच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. आज या साहित्य कट्ट्यामध्ये प्रसिद्ध कवयित्री सुनीता रामचंद्र, स्वाती शुक्ल, ज्योती भारती आणि प्रतिभा साबळे या सहभाग घेत आहेत. या कवयित्रींच्या सहभागातून ‘कविता आणि गझलची मैफल’ रंगणार आहे.
https://www.facebook.com/aaplibaramatinews
सायंकाळी ६ वाजता बारामती एमआयडीसीतील हॉटेल सिटी इनच्या सभागृहात ही मैफल होणार आहे. अधिकाधिक बारामतीकर साहित्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, हा कार्यक्रम ‘आपली बारामती न्यूज’च्या फेसबुक पेजवरून लाईव्ह दाखवला जाणार आहे.