आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महानगरेमहाराष्ट्र

हत्या की आत्महत्या : गर्भवती पत्नीच्या मृतदेहाशेजारी पतीचा गळफास अवस्थेतील मृतदेह; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

महानगरे
ह्याचा प्रसार करा

बीड : प्रतिनिधी

बीड तालुक्यातील वैतागवाडी येथे हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बेडवर गर्भवती पत्नीचा आणि बाजूलाच गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह आढळून आला आहे. गुरुवारी रात्री ही घटना उघड झाली असून एकाचवेळी दोघांचा मृतदेह आढळल्याने ही हत्या की आत्महत्या याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजेश भालचंद्र जगदाळे (वय २६) आणि दीपाली राजेश जगदाळे (वय २४) असे मयत जोडप्याचे नाव आहे. याबाबत नेकनूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  दिपाली आणि राजेश हे दोघेही शेतकरी कुटुंबातील आहेत. एक वर्षापूर्वी दोघांचे लग्न झाले होते. दिपाली ८ महिन्यांची गरोदर होती. काल सायंकाळी नेहमीप्रमाणे गावातील नातेवाईक या दांपत्याच्या घरी गेल्यानंतर आतून प्रतिसाद मिळत नव्हता.

त्यानंतर शेजारी आणि नातेवाईकांनी दार उघडून प्रवेश केला असता दीपाली ही बेडवर मृतावस्थेत आढळली. तर बाजूलाच राजेश यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यानंतर याबाबत नेकनूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येवून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.

दरम्यान, सर्वांशी मिळून मिसळून वागणारे आणि शेती करून उदरनिर्वाह करणारे दांपत्य होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना त्यांनी आत्महत्या केली की त्यांची कुणी हत्या केली हाच प्रश्न आता वैतागवाडीतील ग्रामस्थांना पडला आहे. या प्रकरणाचे गूढ उकलण्याचे आव्हान आता नेकनूर पोलीसांपुढे उभे ठाकले आहे.


ह्याचा प्रसार करा
महानगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us