जळगाव : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नियमांच्या बाबतीत किती काटेकोर असतात याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. गेल्या दोन वर्षात कोरोना काळात अजितदादांना विनामास्क कुणीच पाहिलेलं नाही. इतकंच काय तर मास्कबद्दल अजितदादा किती आग्रही असतात अनेकदा दिसून आलंय. आजही अजित पवार यांनी जळगाव जिल्हा दौऱ्यात एका मास्क न वापरणाऱ्या पत्रकाराला खडसावलं. सर्वांनी नियम पाळा, लसीकरण करून घ्या आणि तिसरी लाट येवू देऊ नका असं आवाहनही करायला ते यावेळी विसरले नाहीत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. जिल्हा नियोजन समिती, कोरोना परिस्थिती आणि विकासकामांचा आढावा बैठक पार पडल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर आपले परखड मत नोंदवत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
या पत्रकार परिषदेदरम्यान, एका पत्रकाराने जळगाव जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बोलताना अजित पवार यांनी तू आधी मास्क लावून बोल असे म्हणत या पत्रकाराला कानपिचक्या दिल्या. सर्वांनीच कोरोनाचे नियम पाळा. तिसरी लाट येवू देवू नका. त्यातून तुम्हाला, तुमच्या कुटुंबीयांना आणि प्रशासनाला त्रास होईल असे काही होवू देवू नका असे आवाहन केले.
आता कुठे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारू लागली असून शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. तसेच व्यवसाय-धंदेही पूर्वपदावर येत आहेत. अशा स्थितीत कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर द्या असेही आवाहन त्यांनी केले. जळगाव जिल्हा लसीकरणात मागे राहिलेला आहे. नागरिकांनी कोणतेही गैरसमज मनात न बाळगता लसीकरण करून घ्यावं. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरही प्रयत्न सुरू असून प्रसिद्धीमाध्यमांनीही यात हातभार लावावा असेही अजित पवार यांनी यावेळी नमूद केले.