जळगाव : प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटानंतर राज्यातील शाळा सुरू होत आहेत. मात्र एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांनाही नाहक त्रास होत आहे. असं असताना एसटी कर्मचाऱ्यांचं हट्टाला पेटणं बरोबर नाही. शेवटी एसटी कर्मचारी आणि प्रवासीही आपलेच आहेत. त्यामुळे समजूतदारपणाची भूमिका घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावं असे आवाहन करतानाच सरकारची सहनशीलता आता संपत चालली आहे, त्यामुळे टोकाचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांसशी संवाद साधला. एसटी कामगारांनी राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाची मागणी केलेली आहे. याबाबत उच्च न्यायालयाने समिती केली आहे. ही समिती जोपर्यंत अहवाल देत नाही, तोपर्यंत राज्य सरकारला याबद्दल निर्णय घेता येणार नाही. या अहवालानंतर व्हायचा तो निर्णय होईल. परंतु तोपर्यंत आजूबाजूच्या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिलेली आहे. एवढा सर्व भार राज्य शासनाने घेतला असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, सरकारने दोन पावले मागे घेत एसटी कर्मचाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा केली, पगारवाढ केली. तरीही एसटी कर्मचारी हट्टाला पेटलेले आहेत हे बरोबर नाही.
राज्यातील शाळा महाविद्यालये सुरू झालीत, विविध ठिकाणी नोकर भरती सुरू आहे. मात्र एसटी बंद असल्याने गोरगरीबांना नाहक त्रास सोसावा लागतो आहे. ही स्थिती असताना एसटी कर्मचाऱ्यांचा हट्टीपणा योग्य नाही. एसटी कर्मचारी आणि प्रवासीही आपलेच आहेत. त्यामुळे सरकार आणि एसटी कर्मचारी यांनी दोन पावले मागे येवून तोडगा काढावा ही आमची भूमिका आहे. मात्र एसटी कर्मचारी माघार घ्यायला तयार नाही, त्यांनी समजूतदारपणा दाखवून कामावर हजर व्हावं, असे आवाहन करून सरकारला टोकाचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू नका असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.