नाशिक : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील ऋणानुबंध अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. अशातच राज ठाकरे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. ८१ व्या वर्षानिमित्त पवारसाहेबांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा झाला. मात्र गेली ६० वर्ष महाराष्ट्र शरदचंद्रदर्शन करतोय; सातत्याने ६० वर्षे प्रतिनिधीत्व करणं ही सोपी बाब नाही. साहेबांच्या गुणांची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे, असे सांगत आपण फोनवरून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा दिल्या असे विचारले असता, राज ठाकरे यांनी स्मितहास्य करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
राज ठाकरे म्हणाले, शरद पवारसाहेबांचा काल सहस्रचंद्रदर्शन सोहळा झाला. मात्र महाराष्ट्र गेली ६० वर्ष शरदचंद्रदर्शन करतोय. सातत्याने ६० वर्ष राजकारणात राहणे ही साधी आणि सोपी गोष्ट नाही. ते या वयातही आपल्या व्याधीवर मात करून समाजात फिरत आहेत. ते ज्याप्रकारे काम करत आहेत ही विलक्षण गोष्ट आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज जे चांगले आहे ते चांगलेच आहे. राजकारणात राजकीय मतभेद असतात हा भाग वेगळा आहे.परंतु चांगल्या गोष्टींना चांगले म्हणणारा आणि वाईट गोष्टींना वाईट म्हणणारा हा महाराष्ट्र आहे. मी पवारसाहेबांपेक्षा वयाने खूपच लहान आहे. त्यांच्याबद्दल कौतुक हा शब्द वापरणे योग्य नाही. परंतु त्यांच्याबद्दल प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे , असेही राज ठाकरे यांनी नमूद केले.