मुंबई : प्रतिनिधी
भाजपला देशात ऐक्य नको आहे. ही बाब शरद पवार यांनी आम्हाला २५ वर्षांपूर्वी सांगितली. मात्र मागच्या दोन वर्षांपूर्वी हे सगळे आम्हाला कळायला लागले, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पवारसाहेबांनी आधीच सांगितलं होतं; मात्र आम्हाला हे कळायला फार उशीर झाला असा मिश्किल टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ६१ भाषणाच्या ‘नेमकचि बोलणे’ या भाषण संग्रहाच्या प्रकाशनाचा सोहळा आज मुंबईत पार पडला. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार यांच्यासह राज्याच्या मंत्रीमंडळातील प्रमुख, विविध पदाधिकारी, लेखक आणि साहित्यिक उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल चढवला.
शरद पवार यांनी सध्या आपल्या देशात चालू असलेल्या विकृत राजकारणाविषयी त्यांच्या भाषणात २५ वर्षीपूर्वीच कोरडे ओढले आहे. भाजपला देशात ऐक्य नको हे त्यांनी हे २५ वर्षीपूर्वीच सांगितले होते. मात्र ते आमच्या दोन वर्षापूर्वी लक्षात आले. त्यांनी १९९६ मध्येच सांगितले होते की, भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे. देशाचे तुकडे करत आहे. परंतु हे सगळे आम्हाला आता कळायला लागले.
दिल्लीत संजय राऊत यांनी शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली होती. यावरून विरोधी पक्षांकडून संजय राऊत यांना लक्ष्य करण्यात आले. त्यावरही राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले, मी पवारसाहेबांना खुर्ची का बसायला दिली याचे कारण माहिती करायचे असेल त्यांनी ‘नेमकचि बोलणे’ हे पवार साहेबांच्या भाषणाचे पुस्तक वाचावे. अत्यंत विकृतपणे टीका करणाऱ्यांना हा ग्रंथ वाचल्यावरच संस्कृती काय असते ते कळेल.