पुणे : प्रतिनिधी
जिल्ह्यात कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणाला पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी आहे. सद्यस्थिती पाहता नागरिकांनी लवकरात लवकर दुसराही डोस घेणे आवश्यक आहे. याबाबत नागरिकांनी सहकार्य केले नाही तर मात्र कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
आज पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. तसेच लसीकरणाबाबतही त्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात कोव्हिड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस १०० टक्के नागरिकांनी घेतला आहे. मात्र दुसरा डोस घेण्यात नागरिक मागे पडत असल्याचे चित्र आहे. सध्या ओमीक्रॉनचे संकट घोंगावत असल्याने नागरिकांनी दुसराही डोस प्राधान्याने घ्यावा. अन्यथा काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.
जिल्ह्यात मागील काही दिवसात लसीकरणाचा वेग वाढला आहे. यापूर्वी नागरिक गंभीर नव्हते. मात्र आता त्यांच्यात जागरूकता आली आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना ओमीक्रॉनचा फारसा त्रास होणार नाही असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येकानेच गांभीर्याने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करून अजित पवार म्हणाले, दूसरा डोस देण्याच्या अनुषंगाने यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्वच भागात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.
ओमीक्रॉनचे पुणे जिल्ह्यात सात रुग्ण आढळले होते. त्यातील पाचजण निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांनीच परदेश प्रवास केलेला होता. मागील काळात परदेश प्रवास केलेल्या नागरिकांचा प्रशासनाकडून शोध घेतला जात असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. ओमीक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून यात कोणताही ढिसाळपणा होणार नाही अशी ग्वाहीदेखील अजित पवार यांनी यावेळी दिली.