नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेत प्रसार झालेल्या कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरियंटने जगाची झोप उडवली आहे. त्यामुळे सर्वच देशांनी सतर्क होत विमान प्रवासावर निर्बंध घातले आहेत. अनेक देशांनी स्थानिक पातळीवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी ओमीक्रॉन व्हेरियंट ‘अति सौम्य’ स्वरुपाचा असून कोणीही घाबरून् जाऊ नये असे आवाहन केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपमधील वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी कॅथरीन स्मॉलवूड यांनी याबाबत आपले मत नोंदवले आहे. टाळेबंदी करावी किंवा विमान सेवेत निर्बंध आणावेत यांसारख्या उपाययोजना करण्याबाबत आम्ही कोणत्याही देशाला कळवलेले नाही. आरोग्य संघटनेचे आणखी एक तज्ज्ञ आणि आफ्रिकेतील प्रादेशिक आरोग्य संचालक डॉ. मॅत्शिदिसो मोटी यांनीही देशांनी टाळेबंदी करू नये, विमान सेवेवर निर्बंध आणू नयेत. लोकांच्या उदरनिर्वाहाचा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे निर्बंध लादण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांच्या मते कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटसारखीच या ओमीक्रॉन व्हेरियंटची लक्षणे घातक नाहीत. अद्याप ओमीक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले नाही. त्यामुळे हा व्हेरियंट घातक नसल्याचे संकेत मिळत आहेत. ओमीक्रॉनच्या रुग्णांमध्ये आढळलेली सर्व लक्षणे अति सौम्य प्रकारची आहेत. त्यामुळे देशांनी किरकोळ घटनांमुळे मोठे निर्णय घेणे अनावश्यक असल्याचे अँजेलिक कोएत्झी यांनी म्हटले आहे.