मुंबई : प्रतिनिधी
वसईतील आदिवासी महिलांना चोर समजून मारहाण करणाऱ्या पोलिसांचं तात्काळ निलंबन करावं आणि संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यानं चालतंय हे महाविकास आघाडी सरकारने दाखवून द्यावं, अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.
वसईच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना पोलिसांनी चोर समजून मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या पोलिसांवर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. तर महिलांना कोणतीही मारहाण केली नसून केवळ समज देण्यासाठी आम्ही त्यांना ताब्यात घेतलं होतं, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. या प्रकरणी आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे.
घटनेला दोन दिवस उलटून गेले असून या प्रकरणी अजूनही पोलिसांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दुसरीकडे मारहाण झालेल्या महिलांना अजूनही न्याय मिळाला नसल्याने या महिलांनी आदिवासी संघटनांना मदत मागितली आहे.
दरम्यान, संबंधित महिलांना मारहाण केली नसल्याचा दावा पोलिसांनी केला असुन या प्रकरणाच्या वरिष्ठ स्तरावरुन चौकशीनंतरच कारवाई केली जाईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.