पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत असलेल्या मोरवाडी येथील शिवकैलास लिंगायत दफनभूमीमध्ये अंत्यविधीसाठी जागाच शिल्लक नसल्यामुळे पदपथावर दफनविधी करण्याची वेळ आली आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून महानगरपालिका नागरीकांना मूलभूत सुविधा देवू शकत नाही का, लोकसंख्येच्या प्रमाणात दफनविधी उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची नाही का असे सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी नागरीकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ही विटंबना थांबवा, असा इशारा दिला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या मोरवाडी येथे असलेल्या शिवकैलास लिंगायत दफनभूमीत सद्यस्थितीत जागाच शिल्लक नाही. त्यामुळे आता नागरीकांना शेजारीच असलेल्या पदपथावर दफनविधी करण्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी संताप व्यक्त करत लोकसंख्येनुसार दफनभूमी उपलब्ध करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
लिंगायत समाजाला जागेअभावी पदपथावर दफनविधी करावा लागत आहे. ही अवस्था पाहून संताप येतोय. पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरीकांना त्यांचे मूलभूत अधिकार पुरवू शकत नाही का..? लोकसंख्येच्या प्रमाणात दफनविधीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे काम महानगरपालिकेचे नाही का..? असे ट्विट करत पार्थ पवार यांनी ही विटंबना तात्काळ थांबवा, असे नमूद केले आहे.
नागरीकांना मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारीचा महानगरपालिकेला विसर पडल्याचे पार्थ पवार यांनी म्हटले आहे. जागा शिल्लक नसल्यामुळे लिंगायत समाज बांधवांना पदपथावर दफनविधी करावा लागतो ही संतापजनक बाब आहे. त्यामुळे महानगरपालिकेने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ही विटंबना थांबवावी, असाही इशारा पार्थ पवार यांनी दिला आहे.
दरम्यान, मोरवाडीतील या दफनभूमीत मोहननगर, काळभोरनगर, रामनगर, महात्मा फुलेनगर, विद्यानगर, दत्तनगर, आनंदनगर, साईबाबानगर, इंदिरानगर, मोरवाडी, लालटोपीनगर, अण्णासाहेब नगर, शाहुनगर, संभाजीनगर आदी परिसरातील नागरिक अंत्यविधीसाठी येतात. सद्यःस्थितीत जागा शिल्लक नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पदपथ फोडून त्या जागेत अंत्यविधी सुरु आहेत. यामुळे व्यक्तीची मरणोत्तर हेळसांड, विटंबना होत असल्याची संतापजनक बाब पुढे आली आहे.