मुंबई : प्रतिनिधी
उद्योगपती राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पती-पत्नीने सुरू केलेल्या फिटनेस सेंटरमध्ये आर्थिक गडबड केल्याप्रकरणी एफआयआरमध्ये त्यांची नावे आहेत. या जोडप्याने संपूर्ण भारतातील गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले आणि जेव्हा त्यांनी दीड कोटी रुपये परत देण्याची मागणी केली तेव्हा त्यांना धमकावल्याचा आरोप या फिर्यादीने केला आहे.
यासंदर्भात शिल्पा शेट्टीने स्पष्टीकरण दिले आहे. कायद्याच्या कक्षेत राहून तिच्या नागरी हक्कांचे रक्षण करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. शिल्पाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये तिची बाजू मांडली.
या पोस्टमध्ये शिल्पा म्हणते, सकाळी उठताच एफआयआरमध्ये माझे आणि राजचे नाव पाहून मला धक्का बसला होता. SFL फिटनेस काशिफ खान चालवत होता. SFL च्या नावाने देशभरात जिम उघडण्याचे अधिकार त्यांच्याकडे होते. यासंबंधीचे सर्व करार त्यांनी केले होते आणि बँकेशी संबंधित व्यवहार आणि दैनंदिन कामकाजही त्यांनी पाहिले होते. आम्हाला पैशांच्या कोणत्याही व्यवहाराची माहिती नाही आणि त्यांनी आम्हाला एक रुपयाही दिलेला नाही. सर्व फ्रँचायझी काशिफशी थेट संपर्क साधत असत.
ही कंपनी 2014 मध्ये बंद झाली आणि तिचे संपूर्ण कामकाज काशिफने पाहिले. मी गेल्या 28 वर्षात खूप मेहनत केली आहे. त्यामुळे माझे नाव आणि प्रतिमा किती सहज कलंकित होत आहे हे पाहून वाईट वाटते, अशा शब्दात तिने या प्रकाराबाबत खंत व्यक्त केली आहे.