
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत व प्रभाग रचना प्रारुप आराखडा प्रसिध्द करण्यात आला. वॉर्ड रचनेचे प्रभागात रूपांतर करताना हक्काचे मतदान प्रभागातून वगळल्याने अनेक इच्छुक नाराज झाले असून प्रथम नगरसेवक बनण्यासाठी आतूर असलेल्या इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे.
बारामती तालुक्यातील पहिली नगरपंचायत असलेल्या माळेगाव नगर पंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगरपंचायत कार्यालयात पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत व प्रभाग रचना प्रारुप आराखडा प्रसिध्दी करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी स्मिता काळे, माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य संजय भोसले,माजी सरपंच जयदीप तावरे, माजी उपसरपंच अजित तांबोळी,धनवान वदक, अशोक सस्ते, संदिप बुरुंगले, चंद्रकांत वाघमोडे, आऊराजे भोसले,उदय चावरे, प्रताप सातपुते, निशिगंध तावरे, फिरोज पठाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
नगर पंचायतीच्या १७ जागेसाठी आरक्षण सोडत झाली. यामधे नऊ महिला व आठ पुरुष आहेत. एक अनुसूचित जाती महिला, तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला, पाच सर्वसाधारण महिला, एक अनुसूचित जाती पुरुष, दोन नागरिकांच्या मागास प्रवर्गातील पुरुष आणि पाच सर्वसाधारण पुरुष अशा एकूण सतरा जागा आहेत.
माळेगाव नगरपंचायत प्रभागनिहाय आरक्षण : प्रभाग १- ना.मा.प्र.महिला, प्रभाग २- सर्वसाधारण,
प्रभाग ३ – सर्वसाधारण, प्रभाग ४ – ना.मा.प्र.महिला, प्रभाग ५ – सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ – अनुसूचित जाती पुरुष, प्रभाग ७ – अनुसूचित जाती महिला, प्रभाग ८- सर्वसाधारण महिला, प्रभाग ९ – ना.मा.प्र., प्रभाग १०- सर्वसाधारण महिला, प्रभाग ११- सर्वसाधारण महिला, प्रभाग १२- सर्वसाधारण, प्रभाग १३- सर्वसाधारण, प्रभाग १४- ना.मा.प्र.महिला, प्रभाग १५- ना.मा.प्र., प्रभाग १६- सर्वसाधारण, प्रभाग १७- सर्वसाधारण महिला