मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अनेक बाबी पुराव्यांसह समोर आणल्या आहेत. त्यांच्यापाठोपाठ आता त्यांच्या कन्या निलोफर मलिक-खान याही मैदानात उतरल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या जावयाच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता निलोफर मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवून जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधताना त्यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा आरोप केला होता. त्यावर आता निलोफर मलिक यांनी फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान आमच्या कुटुंबियांची बदनामी करणारे असल्याने ही नोटीस पाठवल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे एका कुटुंबाची बदनामी झाली आहे. त्यामुळेच माझ्या मुलीने देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. फडणवीस यांनी या प्रकरणी माफी मागितली नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. प्रत्येकाला बोलण्याचा, मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र कोणाची बदनामी करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आम्ही आता फडणवीस यांच्या विरोधात मानहाणीचा दावा दाखल करणार आहोत, असे मलिक यांनी सांगितले.