नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेला पराभव भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यात भाजपला विजय प्राप्त करता आला नाही. याच पार्श्वभूमीवर आणि देशात आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन रविवारी (दि. ७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे.
कोरोना प्रतिबंधामुळे २०१९ नंतर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत पोटनिवडणुकीत झालेला झालेल्या पराभवाच्या कारणावर विचारमंथन होणार आहे. तसेच आगामी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणनीतीदेखील याच बैठकीत आखली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पोटनिवडणुकीत झालेल्या निराशाजनक कामगिरी आणि पाच राज्यातील होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मुख्य मुद्द्यांबरोबरच पक्षाच्या विविध मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाचे पदाधिकारी तसेच केंद्रीय मंत्री उपस्थित असणार आहेत.
या बैठकीची सुरुवात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणाने होणार आहे. तसेच सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने होणार आहे. सध्याची कोविडची परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय पदाधिकारी आणि केंद्रीय मंत्री राजधानीत बैठकीला उपस्थित राहणार आहेत.