आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्र

उंडवडीत दारूचा ट्रक पलटी; ग्रामस्थांनी पळवल्या दारूच्या बाटल्या : अपघाताबाबत संशय

पुणे
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे आज भल्या पहाटे दारू घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, दारूचा ट्रक पलटी झाल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी दारूच्या बाटल्या पळवण्यासाठी एकच गर्दी करत आलेल्या संधीचा चांगलाच फायदा घेतला.

आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पिंपळी येथील मद्य निर्मिती करणाऱ्या प्रकल्पातून दारूचे भरलेले बॉक्स घेऊन (एम एच १२ एफ सी ६१५०) हा ट्रक जळगावकडे निघाला होता. यामध्ये जवळपास ६५ लाख रुपये किंमतीचे ९५० दारूचे बॉक्स भरण्यात आले होते. मात्र पहाटेच्या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला.

उंडवडी कडेपठार येथील एका ढाब्यासमोर ही घटना घडली. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, दारूचा ट्रक पलटी झाल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी एकच गर्दी करत संधी साधून घेतली. अनेकांनी पिशवी भरून दारूच्या बाटल्या नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

बारामती तालुका पोलिसांनी या घटनेची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली.  त्यामुळे दारू नेण्यासाठी झालेली ग्रामस्थांची गर्दी काही प्रमाणात पांगली.

ट्रक पलटी झाला का केला..?

दरम्यान, ही घटना पिंपळीपासून अवघ्या काही अंतरावर घडली आहे. असे असताना चालकाचे नियंत्रण सुटतेच कसे असा सवाल आता उपस्थित होत आहे.  दारू किंवा अन्य माल वाहतूकीत कोणतेही नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळावी यासाठी विमा काढला जातो. आज घडलेल्या अपघातात या विम्याचा फायदा घेण्याचा काही उद्देश होता का याचा तपास होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, अशाच उद्योगासाठी आज हा ट्रक अपघात दाखवला गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.  


ह्याचा प्रसार करा
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us