बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत आहे. अशा वाहनांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांना निवेदन देण्यात आले.
वीट ,वाळू ,मुरुम ,खडी अशा स्वरूपाच्या बांधकामाचे साहित्य घेऊन वाहतूक करणाऱ्या गाड्या या क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करून परिवहन कायद्यांचा भंग करत असल्याबाबतची गोष्ट निदर्शनास आणून देण्यात आली. बहुसंख्य मालवाहतूक गाड्यांच्या नंबर प्लेट देखील पुसलेल्या असतात. बारामती एमआयडीसीमधील बहुसंख्य कंपन्यांमधून बाहेर येणाऱ्या गाड्या व आत जाणाऱ्या गाड्या यांच्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेला असतात.
याबाबत लवकरच वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून फ्लाईंग स्कॉड सुरू करण्याबाबतची मागणी पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी दिले. यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.पोपटराव सूर्यवंशी, बारामती तालुका अध्यक्ष ॲड.निलेश वाबळे, संघटक ऋषिकेश भोसले, शक्ती मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.