नांदेड : प्रतिनिधी
आरोग्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने मागच्या भरतीच्या वेळी घोटाळा केला होता. आम्ही सर्व आमदारांनी मिळून सभागृहात या प्रश्नावर आवाज उठवला. कारण यावेळी मोठ्या प्रमाणात कॉपी झाली होती, पेपर फुटले होते. कोणी तर फोन वरून कॉपी करत होते. अशी सगळी मुलं यावेळी सापडली होती. आरोग्यमंत्र्यांनी यामध्ये चालढकलपणा केला आहे, आरोग्य विभागात टक्केवारीसाठी हा घोटाळा चालू असल्याचा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. काही दिवसांपूर्वी परीक्षेचे सगळे नियोजन चुकले होते. यावरही पडळकर यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. काही दिवसापूर्वी परीक्षेचे आयोजन केले होते. मात्र तेथेही सेंटर चुकले. मुंबईच्या मुलाला औरंगाबादचे कन्नड सेंटर, लातूरच्या मुलाला औरंगाबाद सेंटर, तर एका मुलाला दिल्लीतील नोएडा सेंटर देण्यात आले होते. या पलीकडे चीन, युगांडा अशी सेंटर देण्यात आली. हा कसा कारभार आहे, असा सवालही पडळकर यांनी यावेळी उपस्थित केला.
पडळकर पुढे बोलताना म्हणाले की, यांना सर्वांना राज्यातील मुलांचे करिअर उध्वस्त करायचे आहे. ज्या कंपन्या काळ्या यादीत त्यांना यांनी कंत्राट दिले आहे. या कंपनीच्या माध्यमातून पैसा गोळा करायचा आहे. हे वसुली सरकार आहे. या आरोग्य भरतीसाठी यांनी १० ते १५ लाख रूपये दर काढला आहे. ज्या ठिकाणी त्यांना पैसे मिळत नाही त्या ठिकाण हे अशा प्रकारचा गोंधळ घालतात. टक्केवारीसाठी आरोग्य विभागात घोटाळा चालू आहे.