बारामती : प्रतिनिधी
तालुक्यातील करंजेपूल या गावातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मांत्रिकाच्या सांगण्यावरुन एका महिलेला सैतानाचा अवतार म्हणत तिला नग्न करून बळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मांत्रिकासह पीडित महिलेच्या सासरच्या चार व्यक्तीवर बारामती पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी तसेच जादूटोणाविरोधी प्रतिबंधक कायद्यांतर्गत आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नणंद निता अनिल जाधव (रा. चाकण, ता. खेड), राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या माणिकराव गायकवाड महेंद्र माणिकराव गायकवाड (सर्व रा. करंजेपूल, ता. बारामती) व तात्या नावाचा मांत्रिक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पीडित महिलेने फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, सासू आणि दोन्ही दिर भूतबाधा झाली असल्याचे पसरवले. यासाठी तात्या नावाच्या मांत्रिकाला घरी बोलावले. भस्म लावणे, लिंबू उतरणे,अंगारे-धुपारे टाकणे, उपाशीपोटी ठेवणे असे नैसर्गिक प्रकार केले आहेत.
पीडित महिलेला मुलगी झाल्यानंतर सासरच्यांनी तू पांढऱ्या पायाची असल्याचे म्हणत छळ सुरु केला. सासू आणि दोन्ही दिरानेघरात कोणीही नसल्याचे पाहून ; तिला बेदम मारहाण करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्याच रात्री तात्या मांत्रिकाला घरी बोलून हळदी कुंकवाचे गोल रिंगण करून जबरदस्तीने या रिंगणात बसवले. तसेच त्या महिलेला नग्न करून अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले.
त्या महिलेचा आवाज इतर कोठेही जाऊ नये म्हणून तिच्या तोंडात कापसाचे बोळे करण्यात आले. तसेच डांबून ठेवण्यात आले. मात्र तिचा ओरडलेला आवाज ऐकून शेजारच्यांनी सुटका केली.
या महिलेने घरी आई वडिलांना सगळी हकीगत सांगितल्यानंतर सासर व मांत्रिकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप एकही आरोपीस अटक केलेली नाही. शहर पोलिसांनी हा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिसांकडे वर्ग केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.