सांगली : प्रतिनिधी
सोन्याचा मुकुट द्यायचाच नसल्याने चंद्रकांत पाटील यांनी केलेली ऑफर फसवी आहे. सत्ता गेल्यामुळे तोल जाऊन काही लोक भ्रमिष्ठ झाले आहेत. भाजपातील अनेक नेत्यांना असाच त्रास होत आहे. त्यामुळे हा संशोधनाचा विषय असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
सांगलीतील पोलीस मुख्यालय कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जयंत पाटील उपस्थित होते. दोन दिवसापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जयंत पाटील यांना पराभूत करणाऱ्यांना सोन्याचा मुकुट देण्याची घोषणा केली होती. याच बैठकीत त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत टिका केली होती. यावर जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
सोन्याचा मुकुट कोणालाच घालण्याची वेळ येणार नाही, हे चंद्रकांत दादांना माहिती आहे. त्यामुळे ते जोरात घोषणा करत आहेत. त्यांना वेळ दाखवून देईल, असे पाटील यावेळी म्हणाले.
एकेरी भाषेत बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मात्र सत्ता गेली की माणसाचा तोल जातो. लोक भ्रमिष्ठ होतात. त्यामुळे दादांच्या बाबतीत नेमके काय झाले आहे याबाबत संशोधन करण्याची गरज असल्याचेही जयंत पाटील म्हटले आहे.