मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर बैठक होत आहे. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून लक्ष्य केले जात असल्याबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भाजपा विरोधात नव्याने रणनीती विषयी बोलले जाऊ शकते. या दोन मुद्द्यांवर आज दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणेकडून महाविकास आघाडीमधील नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. अनेक नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी चालू आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार नातेवाइक आणि संबंधितावर आयकर विभागाकडून चौकशीची कारवाई चालू आहे. शिवसेनेच्या नेत्यांवरही तपास यंत्रणेकडून चौकशीची कारवाई चालू आहे. त्यासोबतच भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक टीकात्मक आरोप होत आहेत, या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मधील आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून होणारी कारवाई ही राजकीय हेतूने चालू असल्याचा आरोप भाजपावर केला होता. या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकच आहे, असा संदेश देण्यासाठी ही बैठक होणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी होणारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.