मुंबई : प्रतिनिधी
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रीमंडळ बैठकीत ही घोषणा केली.
राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज देण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या मदतीची आणि एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये, बागायत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर २५ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. ही मदत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत केली जाणार आहे.