लखनऊ : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील लखिमपुर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात स्वतः दखल घेत , राज्य सरकारला आरोपीवर केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे. अशातच या घटनेला चार दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी केवळदोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेत मुख्य आरोप असलेला केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा पोलिसांना सापडलेला नाही. पोलिसांनी मिश्रा यांच्या घरावर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस लावली आहे.
या घटनेत पोलिसांनी आशिष पांडे आणि लवकुश राणा या दोन आरोपींना अटक केलेले आहे. हे दोन्ही आरोपी आशीष मिश्रा याचे निकटवर्ती असल्याचे समजते. मात्र अद्याप पोलिसांना अशिष मिश्रा हा सापडलेला नाही. याप्रकरणी पोलिसांनी मिश्रा याच्या घराबाहेर नोटीस लावली आहे. या नोटिसीमध्ये मिश्रा याला आज सकाळी दहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, मिश्रा याच्यावर एफआयआर दाखल करून गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनात आशीष मिश्रा गाडी चालवत होता. तेव्हा त्या गाडीखाली शेतकरी चिरडले आहेत. तसेच मिश्रा हा गाडीखाली उतरला आणि शेतकऱ्यांवर गोळीबार केला आहे.नंतर ती तेथून पळून गेला आहे. असे त्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.