इंदापूर : प्रतिनिधी
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील ज्येष्ठ नेते जगन्नाथराव मारुतीराव मोरे उर्फ जमा मोरे (वय ८८ ) यांचे आज (बुधवारी) सकाळी सहा वाजता निधन झाले. जमा आप्पा म्हणून ते जिल्ह्यात प्रसिद्ध होते.
शरद पवार व जमा मोरे यांचे जवळपास ४६ वर्षांपेक्षा अधिक काळ स्नेहपूर्ण संबंध राहिलेत. त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तसेच इंदापूर तालुका पंचायत समितीच्या स्थापनेच्या सुरुवातीलाच दहा वर्षात सभापतीपदीही त्यांनी काम केले. पवारसाहेबांचे अत्यंत जूने आणि निकटचे सहकारी म्हणून त्यांची ओळख होती.
सन 1975 सालापासून शरद पवार आणि मोरे यांचे संबंध आजपर्यंत टिकून होते. निमगाव केतकीवरून पुढे कुठेही जात असताना शरद पवार हे जमाआप्पा यांना भेटल्याशिवाय जात नव्हते. जमा मोर यांनी निमगाव केतकीतून शरद पवार व गोविंदराव आदिक यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. तो प्रसंग आजही गावकरी मोठ्या उत्साहाने सांगतात.
पवारसाहेबांसोबत जमा फारूक अब्दुल्ला यांच्या प्रचारासाठी जम्मूपर्यंत गेले होते. मोरे यांची सेकंड आमदार म्हणून ओळख होती. विधानसभेच्या निवडणुका लढविल्यानंतर त्यांची सेकंड आमदार म्हणून ओळख निर्माण झाल्याने त्यांचा राजकारणात व प्रशासनात दबदबा यातून दिसायचा. मोरे यांनी त्यांच्या कारकिर्दीत गावासह तालुक्यात अनेक विकासकामे केली.
विनोदी शैलीचे आप्पांची भाषणे ऐकायला मोठी गर्दी व्हायची. पवारसाहेबांसोबतचे अनुभव प्रसंग व संपूर्ण कारकिर्दीचा लेखाजोखा त्यांनी गुंफियले मोती मैत्रीचे या पुस्तकातून प्रकाशित केला होता. शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मंत्रीगण, खासदार, आमदार त्यांच्याकडे आवर्जून भेट देण्यासाठी येत असत. त्यांच्या निधनामुळे निमगाव केतकी गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.