नांदेड : प्रतिनिधी
तिघेच नाहीतर पाच जणही एकत्र येऊन आमच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुरून उरू, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. तिघाडीचे सरकार त्यांच्या कर्माने लवकरच कोसळणार आहे. पण यासाठीचा मुहूर्त सांगणार नाही, असेही भाकीत चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
देलगुर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने सुभाष बावणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे यांचा काल त्यांच्या समर्थकांसह भाजपामध्ये पक्ष प्रवेश सोहळा झाला. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, खासदार प्रतापराव चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, राजेश महाराज देगलूरकर, गणेश हाके, गंगाराम ठक्करवाड, भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रवीण साले, गंगाधर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकार तुमचे आहे. सरकारचे प्रमुख सुद्धा तुमचेच आहेत. तरीसुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमच्या कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे. तुम्ही असेच गप्प राहणार असाल तर एक एक कार्यकर्ता दूर होणार नाही तर काय? असा सवाल करत सत्तेसाठी किती लाचारी पत्करणार हे ठरवण्याची वेळ आता आली असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आचारसंहितेची अडचण ठरणार नाही. हे सरकारला सांगण्याची गरज आहे. मात्र त्यांना मदत द्यायचीच नाही. आमची सत्ता असताना आम्ही शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची मदत केली होती.