बारामती : प्रतिनिधी
सध्या प्रत्येक घरातील जमीन हे भांडणाचे मूळ कारण आहे. हे मूळ कारण मिटवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबांनो, कोर्टाची पायरी चढू नका, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.
बारामतीमध्ये पवार यांच्या हस्ते डिजिटल स्वाक्षरीत सातबारा वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती नीता फरांदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्यासह सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
आम्ही लहान असताना तलाठ्यांनी कोणाच्याही जमिनी कोणाच्याही नावावर केलेल्या आहेत. हे फार आगोदर होते. आता मात्र हे सगळे बदलेले आहे. आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. महसूल विभागात अधिक सुलभता आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यासाठी विविध उपक्रम हाती घेतले असल्याचे सांगून अजित पवार यांनी महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना उतारा मिळवण्यासाठी जास्त फेऱ्या मारण्याची गरज पडणार नसल्याचे नमूद केले.
अजित पवार पुढे म्हणाले, मी दर आठवड्याला ज्यावेळी नागरिकांचे कामांचे निवेदन घेतो. त्यावेळी जमिनी, रस्ते या संदर्भात जास्त कामे येतात. अनेकवेळा जमिनीचे वाद होतात. अनेक वर्षे सख्खे भाऊ एकमेकांचे तोंड पाहत नाहीत. दोघेही कोर्टात जातात. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हटले जाते. तेच मी सांगत आहे की , बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका.