मुंबई : प्रतिनिधी
आरोग्य विभागाच्या अचानक एक दिवस आगोदर पुढे ढकलेल्या भरती परीक्षांच्या नवीन तारखा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार गट ‘क’ची परीक्षा २४ ऑक्टोंबर, तर गट ‘ड’ची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. परीक्षासंदर्भात आज झालेल्या बैठकीनंतर टोपे यांनी ही घोषणा केली. आरोग्य विभागाची ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील आरोग्य सेवकांची परीक्षा २४ आणि २६ सप्टेंबर रोजी होणार होती.
सर्व प्रकारचे योग्य नियोजन करून नवीन तारखा जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षांच्या दोन्ही दिवशी रविवार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रासाठी शाळा उपलब्ध असणार आहेत. त्याचसोबत उमेदवारांना नऊ दिवस आगोदर प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. या वेळी उमेदवाराला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. या अनुषंगाने सर्व नियोजन करण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी नमूद केले.
कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आरोग्य विभागात होत असलेली ही भरती मोठी असल्याने याबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहे. या भरतीमध्ये कोठेही कुठल्याही प्रकारे गैरप्रकार आढळला तर लगेच तक्रार दाखल करा. परीक्षा पारदर्शक व्हाव्यात यासाठी तक्रार नोंदवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.