
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेचे नेते अनंत गीते यांनी ‘शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत’ असे खळबळजनक विधान केले आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी शरद पवार हे देशाचे नेते आहेत, असे सांगत अधिक बोलणे टाळले.
माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी श्रीवर्धन येथील एका कार्यक्रमात बोलताना ‘शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत’ असे विधान केले होते. त्यावर संजय राऊत यांना विचारले असता ‘शरद पवार हे देशाचे नेते आहेत. गीते यांनी केलेल्या विधानाचे प्रकरण मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया दिली. आज दिल्लीत संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य करत भाजपलाही कानपिचक्या दिल्या.
राज्याचा विनाश करण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. पुढील होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा समन्वयाचा व्यक्तिगत पातळीवरचा विषय आहे. विरोधक एकत्र येत असतील आणि त्याबद्दल प्रस्ताव येत असेल, तर त्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असे सांगून राऊत म्हणाले, राज्यातील सरकार ठाकरे चालवतात. जनतेने त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचीही महत्वाची भूमिका आहे.
सत्ता गेली म्हणून विरोधी पक्षाने जनते सोबत द्वेषाने वागणे बरोबर नाही. माहाविकास आघाडीचे सरकार कायद्याच्या चौकटीत राहून काम करत आहे. आम्हाला कायदे आणि नियम माहिती आहेत. कोणी जर चिखल उडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते बरोबर नाही असेही त्यांनी नमूद केले. यावेळी किरीट सोमय्या यांच्याकडून सुरू असलेल्या आरोपांबद्दल विचारले असता किरीट सोमय्या कोण आहेत त्यांना मी ओळखत नाही असा टोला त्यांनी लगावला.