
मुंबई : प्रतिनिधी
खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या जागेसाठी भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याची घोषणा करताच कॉंग्रेसकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनी पाटील यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे.
राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तत्पूर्वी आज कॉंग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यास संमती दिली. याबद्दल कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांनी माहिती दिली आहे. लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.