दौंड : प्रतिनिधी
दौंड शहरांमध्ये बेकायदेशीर आणि बेशिस्तपणा खपवून घेणार नसून जो कोणी कायद्याची पायमल्ली करेल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दौंड पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिला आहे.
दौंड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदाचा पदभार विनोद घुगे यांनी नुकताच स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आज स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. दौंड शहर आणि परिसरात अवैध कारभारांना थारा देणार नसल्याचे सांगत जो कोणी उद्दामपणा करेल, त्याला सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
दौंडमध्ये बेशिस्त वाहतुकीसह अवैध व्यवसायांवर धडक कारवाई करण्याची भूमिका पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी घेतली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी कारवाईही सुरू केली आहे. याबाबत बोलताना घुगे म्हणाले, दौंड शहर आणि परिसरात अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये या अनुषंगाने सर्व त्या उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.
शहर आणि परिसरात शांतता प्रस्थापित करणे हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य असून त्याबाबत पोलिस यंत्रणेकडून कारवाई केली जाणार आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच अन्य चुकीच्या कारभारांवरही पोलिसांची बारकाईने नजर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.