बारामती : प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारीत आज माणूस इच्छा असूनही एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही. असे असताना कोविड १९ संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या दिशा निर्देशाचे पालन करून व्हर्च्युअल संत समागमाच्या माध्यमातून सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज देश-विदेशातील भक्तांना दर्शन देऊन भक्तीचा उत्साह वाढवित आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून बुधवार दि, १८ आॕगस्ट रोजी बारामतीसह कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पूणे, खरसई, चिपळूण, वाडसा ह्या सात झोन मिळून सायं. ७ ते ९.३० यावेळेत विशाल व्हर्च्युअल संत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये बारामती, इंदापूरसह सातारा जिल्ह्यातील ४००० पेक्षा जास्त भक्त सहभागी होऊन आपले भक्तीमय रूप प्रकट करणार आहेत. याची जय्यत तयारी बारामती क्षेत्रासह सातारा झोनमध्ये सुरू आहे.
कार्यक्रचे स्वरूप गीत, विचार, लघू कवी दरबार व शेवटी सद्गुरू माताजींचे आशीर्वाद भरे विचार असे आहे. या कार्यक्रमाचा लाभ संत निरंकारी मिशनच्या अधिकृत वेबसाईट (https://live.nirankari.org) वर घेता येईल.
गेले २० दिवस वाई, जावळी, महाबळेश्वरच्या अतिवृष्टीग्रस्त भागात अनेक समाजसेवी उपक्रम राबवून बारामती क्षेत्राच्या निरंकारी मिशनने बाधितांना मदतीचा हात दिला. या समाजसेवी उपक्रमाबरोबरच आध्यात्मिकता जागृत ठेवण्याचे काम अशा व्हर्च्युअल संत समागमाच्या माध्यमातून सद्गुरू माता करीत आहेत. या व्हर्च्युअल संत समागमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे आणि बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांनी केले आहे.