मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. मात्र आता कोरोनाचा प्रसार कमी होत असल्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाकडून देण्यात आले आहेत.
राज्यात कोरोना संकटामुळे सहकारी संस्था आणि जिल्हा बँकेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्हा बँकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. काही जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपून १५ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी संपला आहे. सहकार विभागानं कोरोनामुळे ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुका ३१ ऑगस्टनंतर तातडीने घेण्यात याव्या यासाठी आतापासूनच प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हा बँकेची प्रारुप मतदार यादी तयार करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे सहकार विभागाने आताच आदेश काढले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगलेली पाहायला मिळणार आहे.