आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मनोरंजनमहानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Big News : राज्यातील शेकडो लोककलावंतांना मोठा दिलासा; राज्यातील 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत

मनोरंजन
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील शेकडो लोककलावंत,लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोवीड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत एक बैठक पार पडली यात मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली असून यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा असे निर्देश दिले आहेत.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक झाली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान येथे सांस्कृतिक कार्य विभागाशी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा,सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, सिध्दीविनायक गणेश मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते.

गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढा देत आहे. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केली.

56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत

राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास 8 हजार कलाकार असून राज्यात उर्वरित जिल्हयात जवळपास 48 हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रती कलाकार 5 हजार रुपये मदत देण्यात येणार असून यासाठी जवळपास 28 कोटी रुपये खर्च होणार आहे.

समूह लोककलापथकांचे चालक मालक आणि निर्माते यांनाही एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेज

राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत. कोविडमुळे वर्षभरात प्रयोग न  झाल्याने त्यांच्यापुढे आर्थि संकट उभे असून शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी,दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज,अशा जवळपास 847 संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून यासाठी 6 कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी 1 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले. या बैठकीदरम्यान सांस्कृतिक कार्य विभागाचे सादरीकरणही करण्यात आले.


ह्याचा प्रसार करा
मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us