पुणे : प्रतिनिधी
मनसेच्या ज्या शाखेचा अध्यक्ष चांगल्या पद्धतीने काम करेल, त्याच्या घरी मी जेवायला येईन अशी ऑफरच महाराष्ट्रा नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अधिक जोमाने काम करण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच चांगले काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी जेवायला येण्याची ऑफरही त्यांनी दिली आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत. नाशिक दौरा आटपून ते आज पुण्यात दाखल झाले. ते पुण्यात तीन दिवस थांबून निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत. आज त्यांनी विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा आणि पक्षाचे काम अधिक जोमाने व्हावे यासाठी त्यांनी खुली ऑफर दिली आहे.
जो शाखाध्यक्ष चांगल्या पद्धतीने काम करेल, त्याच्या घरी मी स्वत: जेवायला येईन असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना ‘बूस्टर डोस’ दिला आहे. यापूर्वीच्या प्रभाग अध्यक्षांच्या नियुक्त्या रद्द केल्या जाणार असल्याचे स्पष्ट करून नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक महिन्यात तीन दिवस पुण्यात येवून पक्षाच्या कामाचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, एकीकडे मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगत असतानाच राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच आज त्यांनी थेट घरी जेवायला येण्याची ऑफर देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.