दौंड : प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील यवत येथे भोगवटा वर्ग बदलून देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यासह त्याच्या साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याबाबत संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दौंड तालुक्यातील यवत परिसरातील एका शेतकऱ्याने भोगवटा वर्ग बदलण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी तलाठी कुंडलीक नामदेव केंद्रे याने ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
संबंधित शेतकऱ्याने या तलाठ्याशी तडजोड करत ३० हजार रुपये देण्याचे मान्य केले. त्यानुसार आज ही रक्कम स्वीकारताना तलाठी कुंडलीक केंद्रे आणि त्याचा साथीदार शंकर दत्तू टुले या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असून या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.