मुंबई : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आता उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरीत होणार आहे. त्यामुळे या रुग्णालयाची क्षमता आता १०० खाटांची होणार आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने विशेष बाब म्हणून सुपे ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीत वाढ करत उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता दिली असल्याचे आदेश पारित केले आहेत.
बारामती तालुक्यातील ३० खाटांच्या क्षमतेचे सुपे ग्रामीण रुग्णालय हे परिसरातील गावांसाठी उपयुक्त ठरत आहे. परंतु लोकसंख्येच्या दृष्टीने रुग्णालयाची क्षमता वाढवण्याची गरज लक्षात घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश दिले होते. त्यानुसार आज आरोग्य विभागाने आदेश काढत सुप्यातील ग्रामीण रुग्णालयाची श्रेणी वाढवून उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता दिल्याचे आदेश पारित केले आहेत.
आज झालेल्या निर्णयामुळे सुप्यातील या रुग्णालयाची क्षमता १०० खाटांची होणार आहे. त्याचबरोबर नवीन इमारत आणि अन्य सुविधाही या रुग्णालयात उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे सुपे परिसरातील गावांमधील नागरिकांसाठी आता अधिकची आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.