बारामती : प्रतिनिधी
बारामतीतील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. त्यानुसार आता सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाने वेळ वाढवून दिली असली तरी कोरोना नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह दर ५ टक्क्यापर्यंत खाली आल्याशिवाय निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर आज प्रशासन आणि व्यापारी वर्गाची बैठक पार पडली. त्यामध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सर्वच दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बारामतीत मागील महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला कडक उपाययोजना राबवण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार बारामतीत अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्याचा परिणाम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर झाला. त्यामुळे आता या निर्बंधातून हळूहळू सूट दिली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने आता सर्व दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन करुन अधिकाधिक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास १५ दिवसांसाठी संबंधित दुकाने सील केली जातील, असा इशाराही देण्यात आला आहे.