मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कोरोना प्रादुर्भाव वाढत असतानाच सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज्यात १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र दिनी अर्थात १ मेपासून केली जाणार आहे.
केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वांनाच मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबतचे संकेत दिले होते. त्यानुसार या लसीकरणाबाबत लवकरच निविदा काढली जाणार आहे. कमीत कमी दरात लस मिळावी या हेतूने जागतिक निविदा काढण्यात येणार असल्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. राज्य शासन स्वखर्चातून हे लसीकरण करणार आहे.
दरम्यान, कोव्हीशिल्ड लस ही केंद्राला १५० रुपयांना, तर राज्यांना ४०० आणि खासगी वितरणासाठी ६०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. तर कोव्हॅक्सिन ही लस राज्यांना ६०० रुपये आणि खासगी वितरणासाठी १२०० रुपयांत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे केंद्र शासन ४५ वर्षाखालील लोकांना मोफत लस देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोफत लस देणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.