आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पिंपरी-चिंचवडपुणेबारामतीमहानगरेमहाराष्ट्र

‘कोरोना’ नियंत्रण उपाययोजनांसाठी आमदार निधीतून एक कोटीचा निधी खर्च करण्यास शासन मंजुरी देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी-चिंचवड
ह्याचा प्रसार करा

▪️नागरिकांनी नियम पाळावेत, अन्यथा आणखी कडक निर्बंध.
▪️डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्यसेवेबद्दल कृतज्ञता.
▪ आरोग्य व्यवस्था अधिकाधिक सक्षम करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नशील.
▪ लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर.

पुणे : प्रतिनिधी 

‘कोरोना’ची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून ‘कोरोना’ नियंत्रणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यातील सर्व आमदारांना ‘कोविड-19’ विषयक बाबींसाठी आमदार निधीतील एक कोटी निधी खर्च करण्यासाठी राज्य शासन मंजुरी देईल, असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.

पुण्यातील विधानभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना स्थिती आणि उपाययोजना’बाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी मंत्री तथा आमदार चंद्रकांत पाटील, आमदार संग्राम थोपटे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, आमदार दिलीप मोहिते, आमदार ॲड अशोक पवार, आमदार राहूल कुल, आमदार संजय जगताप, आमदार अतुल बेनके आदी मान्यवरांसह विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, उपायुक्त संतोष पाटील, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोना विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरोग्य विषयक सेवा- सुविधांमध्ये वाढ करा, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण रुग्णालय व दळवी रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट उभा करावा. मनुष्यबळाअभावी शासकीय रुग्णालयात वापर होत नसलेले व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना तात्पुरत्या स्वरूपात वापरासाठी द्यावेत.

पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये नवीन विद्युतदाहिनी बसविण्याची कार्यवाही करावी. डॉक्टरांच्या कामांच्या वेळेचे नियोजन करा. शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. गृह अलगीकरणातील रुग्णांकडून नियमांची काटेकोर पालन होते का, याकडे लक्ष द्या. रेमडेसिविरच्या बाबतीत कडक धोरण राबवा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी नियम पाळून सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनी कडक नियम पाळावेत, अन्यथा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणखी कडक निर्बंध लावावे लागतील, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. सद्य परिस्थितीत आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती दिली.खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले, रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करायला हवी. ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन व्हायला हवे. आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्व मतदार संघांमध्ये लोकसहभागातून बेडची संख्या वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करुन लसीकरणाचा वेग वाढवायला हवा.

डॉ. सुभाष साळुंके यांनी ‘कोविड -19’च्या नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. येत्या काळात रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या वापराबाबत आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक सूचना डॉक्टरांना द्यायला हव्यात.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ट्रॅकिंग, टेस्टिंग, कंटेन्मेंट झोन, लसीकरण व्यवस्था, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णदर, मृत्यू दर, पुणे ग्रामीण भागातील रुग्णवाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, ऑक्सिजन व रेमडेसीवीर मागणी व सद्यस्थिती तसेच पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील ‘कोविड-19’च्या सद्यस्थितीची माहिती दिली. प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
पिंपरी-चिंचवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us