
मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाची साखळी तुटावी आणि जनतेला या भयंकर संकटातून दिलासा मिळावा यासाठी राज्यात काल रात्रीपासून १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु संचारबंदीनंतरही नियमांचे पालन होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत आणखी कडक निर्बंध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे लोकल रेल्वे बंद करण्यासह पेट्रोल, डिझेल विक्री बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात कडक लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र त्याला म्हणावा असा नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत आणखी कडक निर्बंध लागू करून कोरोनाची साखळी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राज्य शासनाने संचारबंदी जाहीर करताना काही सवलती दिल्या आहेत. त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मुंबई, पुणे आणि अन्य प्रमुख शहरांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ दिसून आली. किराणा दुकाने, भाजी मंडई येथील गर्दीतही फरक पडलेला नाही. वास्तविक गर्दी कमी करण्याच्या हेतूने सध्या संचारबंदी लागू केलेली आहे. असे असताना नियमांचे उल्लंघन होत असल्याने येत्या दोन दिवसांत कठोर निर्बंध लादले जातील, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.