पुणे : प्रतिनिधी
स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुण्यातील शितल महाजन (राणे) या तरुणीने नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. शीतल महाजनने नऊवारी साडी परिधान करून हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे पॅरामोटरच्या साहाय्याने सहा हजार फूट उंचीवरून पॅराजम्पिंग केले आहे. पॅरामोटरमधून पॅराजम्प करणारी शीतल महाजन पहिलीच भारतीय महिला आहे.
पॅराजम्प केल्यानंतर शीतल महाजन म्हणाली,मी सामान्य कुटुंबातून पुढे येत पॅराशूट जम्पिंगमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे. जगभर पॅराशुट जंपिंग करणारी मी पहिली भारतीय महिला आहे. माझ्या नावावर आतापर्यंत १८ राष्ट्रीय आणि ६ आंतरराष्ट्रीय विक्रम आहेत. तसेच फेडरेशन ऑफ एरोनॉटिकल इंटरनॅशनलने सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले आहे.
मी साडी परिधान करून आतापर्यंत आपल्या देशाबाहेर अनेक ठिकाणी पॅराशूट जम्पिंग केलेली आहे. मात्र माझ्या कर्मभूमी आणि जन्मभूमी असलेल्या पुण्यात नऊवारी साडी परिधान करून पॅराशूट जम्पिंग केली आहे. त्यामुळे ही पॅराशूट जम्पिंग माझ्यासाठी विशेष आहे. ही पॅराशूट जम्पिंग आयुष्यभर अविस्मरणीय राहील, अशा भावना शीतल महाजनने व्यक्त केल्या.