पुणे : प्रतिनिधी
अनाथांसाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं आज वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं.
अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचलं. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. कमी शिक्षण असूनही अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी त्या शेवटपर्यंत झटत राहिल्या. आयुष्यात आलेल्या संकटांमुळे त्या समाजसेवा क्षेत्रात आल्या. त्यातूनच त्यांनी अनाथ मुलांसाठी कार्याला सुरुवात केली.
मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे हजारो अनाथांची माय हरपली आहे.