पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. या प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमूनेच बदलण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता पुण्याच्या ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याचा ठपका या डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे.
पुण्यात दि. १९ मे रोजी मध्यरात्री एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दोघांचा बळी घेतला. त्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली. या दरम्यान त्याची तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली. मात्र या आरोपीला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी चक्क रक्ताचे नमुनेच बादळल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हरनोर अशी या डॉक्टरांची नावे आहेत. त्यांना पुणे पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली आहे.
दरम्यान या घटनेतील अल्पवयीन आरोपीला सुरुवातीला बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला होता. मात्र नंतर पोलिसांनी याचिका आणि पुनर्विलोकन अर्ज केल्यानंतर त्याला ५ जूनपर्यंत बालगृहात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील आणि आजोबालाही अटक केली आहे.