मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांनी आज असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी राष्ट्रीय युवती अध्यक्षा सोनिया दुहान यांनीही आज मुंबईत झालेल्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याही अजितदादांसोबत जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आज मुंबईतील गवारे क्लब हाऊस येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा अत्राम, नरहरी झिरवळ, रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सर्व आमदार, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत धीरज शर्मा यांनी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. मागील काही दिवसांत पक्षातील स्थिती पाहिल्यानंतर अजितदादांच्या नेतृत्वाची गरज लक्षात आली. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय आपण घेतला असं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, धीरज शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे निश्चितच फायदा होईल असा विश्वास यावेळी अजितदादांनी व्यक्त केला.
दुसरीकडे आज मुंबईत झालेल्या बैठकीत सोनिया दुहान याही उपस्थित राहिल्याची बातमी माध्यमांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याही अजितदादांसोबत काम करताना दिसतील यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्लीत पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या या दोन युवा चेहऱ्यांनी अजितदादांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.