बारामती : प्रतिनिधी
काल विद्या प्रतिष्ठानमधील बैठकीदरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांनी पुरंदरचा दौरा रद्द केला होता. आज सकाळी पुन्हा डॉक्टरांकडून शरद पवार यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी शरद पवार यांना काही दिवस प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. मात्र घरी राहून नागरिकांच्या भेटी घेण्यास हरकत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुढील २-३ दिवस शरद पवार हे गोविंद बागेत नागरिकांच्या भेटी घेतील, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
काल विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीदरम्यान, शरद पवार यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. सततचा प्रवास, अनियमित विश्रांती यामुळे त्रास उदभवल्याचं सांगत डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. आज सकाळी पुन्हा शरद पवार यांची तपासणी केल्यानंतर पुढील काही दिवस प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार यांचे पुढील २-३ दिवसातील दौरे रद्द करण्यात आले आहेत. परंतु शरद पवार हे गोविंद बाग या निवासस्थानी भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत. या ठिकाणी पुढील २-३ दिवस येणाऱ्या नागरिकांच्या ते भेटी घेतील, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. सध्या शरद पवार यांची प्रकृती चांगली असून डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांनी नागरिकांच्या भेटी घेण्यास सुरुवातही केली आहे.