मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे. डॉक्टरांकडून त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अजितदादा सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेणार नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. काही दिवसांतच अजितदादा पुन्हा सक्रिय होतील असेही त्यांनी नमूद केले आहे.
माध्यमांमध्ये अजितदादांच्या नाराजीच्या बातम्या येत आहेत. त्यावरून प्रफुल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत ट्विट करत अजितदादांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून लवकरच ते पुन्हा सक्रिय होतील असेही प्रफुल्ल पटेल यांनी नमूद केले आहे.
अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित नसल्याच्या प्रसारमाध्यमांत बातम्या सुरू आहेत. परंतु मी हे स्पष्ट करू इच्छितो की कालपासून त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे आणि त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाले की ते आपली समर्पित सार्वजनिक कर्तव्ये पुढे चालू ठेवण्यासाठी पूर्ण शक्तीने परत येतील, असे प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्रास जाणवत होता. त्यानंतर तपासणी केली असता डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अजितदादा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा सक्रिय होतील.